मुंबई प्रतिनिधी :
दि. २१ ऑगस्ट २०२५
राज्यात ९ ऑगस्टपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे १९ जिल्ह्यांतील १८७ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, यामुळे ८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. ही माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कृषिमंत्र्यांनी कृषी आणि महसूल विभागाला निर्देश दिले आहेत की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात दिला जावा आणि पंचनामे जलद गतीने पूर्ण करून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये.
जिवीतहानी, जनावरांचे नुकसान, घरेही जलमय
अतिवृष्टीमुळे राज्यात २१ जणांचा मृत्यू झाला असून, पशुधन व घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच एनडीआरएफच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार भरपाई देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
दुसरीकडे, कृषिमंत्री भरणे यांनी स्वतः धाराशिव, वाशिम आणि नांदेड जिल्ह्यांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांनी सांगितलं की, प्रत्येक गावातील नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर सरकारकडे पोहोचवण्यात येईल आणि तत्काळ मदत दिली जाईल.
सर्वाधिक फटका कोणत्या जिल्ह्यांना?
शेतकरी संकटात सापडले असून, नांदेड, वाशिम, यवतमाळ, अकोला, सोलापूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शेतीचे नुकसान झालं आहे. ११ जिल्ह्यांमध्ये १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झालं आहे.
सोयाबीन, मका, कापूस, तूर, उडीद, मूग यासारखी मुख्य खरीप पीकं यावेळी पावसाच्या पाण्यात गेली आहेत. भाजीपाला, फळपिकं, कांदा, ऊस, बाजरी, ज्वारी आणि हळद यांनाही गंभीर फटका बसल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली.
सरकारची भूमिका स्पष्ट – ‘मदतीसाठी शेतकऱ्यांमागे खंबीरपणे उभं’
कृषिमंत्री भरणे म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असलं तरी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. प्रशासनाने तत्परतेने काम करून योग्य ती भरपाई पोहोचवावी.”
जिल्हानिहाय शेती नुकसानीचा आढावा
जिल्हा नुकसान (हेक्टरमध्ये)
नांदेड २.८६ लाख हेक्टर
वाशिम १.६५ लाख हेक्टर
यवतमाळ ८१ हजार हेक्टर
बुलढाणा ७५ हजार हेक्टर
अकोला ४४ हजार हेक्टर
सोलापूर ४२ हजार हेक्टर
हिंगोली ४० हजार हेक्टर
धाराशिव २९ हजार हेक्टर
परभणी २० हजार हेक्टर
अमरावती १३ हजार हेक्टर
जळगाव १२ हजार हेक्टर