पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ०९ जुन २०२१
‘अशक्य ते शक्य करणारा नेता म्हणून शरद पवार यांना मानले जाते. असे नेतृत्व पक्षाला लाभले असताना प्रत्येकाने जिल्ह्याबाहेरसुद्धा कार्यरत राहून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आमदारांचे शतक करावे ‘,अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे व्यक्त केली.
पुणे शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ माने यांनी आयोजित केलेल्या ‘मागे वळून पाहताना’ या ऑनलाईन संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या संवाद कार्यक्रमाला बुधवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात त्यांनी राष्टवादी काँग्रेस च्या स्थापनेच्या वेळची परिस्थिती आणि आजवरची वाटचाल उलगडून सांगितली.
आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर राज्यात सत्तेवर येऊ शकली नाही,अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले,’ जिल्ह्याबाहेर लक्ष न देणाऱ्या नेत्यांमुळे एकहाती सत्ता आणता आली नाही.तीन वर्षांनी पक्षाचा रोप्य महोत्सव आहे.विभागवार लक्ष देऊन निर्धार केला तर संघटना वाढू शकते. २०२४ ला आमदारांची संख्या १०० वर नेण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. महाराष्ट्र राष्ट्रवादीमय केला पाहिजे’.
अंकुश काकडे म्हणाले,’फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात सुडाचे राजकारण केले. बँका ,कारखाने यांना त्रास देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजप मध्ये येण्यास भाग पाडले. राज्य सहकारी बँकेच्या चौकशीत काही निष्पन्न झाले नाही. हवे तसे मतदार संघ रचना करून अनेक ठिकाणी सत्ता आणली. विधानसभा निवडणूक सहज जिंकू ,असा आत्मविश्वास त्याना होता. प्रचारात त्यांनी प्रचाराची पातळी राखली नाही. शरद पवार हे खंबीरपणे फिरत राहिले. साताऱ्यात पावसात केलेल्या भाषणाने राजकारणाचा नूर बदलला. भिन्न विचाराचे लोक एकत्र येतील असे कोणाला वाटत नव्हते. शरद पवार यांच्या आग्रहाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. कोरोना ,वादळे ,केंद्राची आडमुठी भूमिका याला तोंड देत चांगले काम करून दाखवले आहे. दुसऱ्या फळीलादेखील पवार यांनी उभे केले आहे.