वाशिम प्रतिनिधी :
दि. २१ ऑगस्ट २०२५
१५ ते १८ ऑगस्टदरम्यान वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतमाल, जनावरे आणि घरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री व वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, सरकार त्यांच्या पाठीशी ठाम उभं आहे.”
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
पिकांचे नुकसान वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाले असून, वाशिम तालुक्यात ९८ गावे बाधित होऊन सुमारे ३९,३१० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. रिसोड तालुक्यात ८५ गावे आणि ४८,६४५ हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे. मालेगाव तालुक्यात १२७ गावे बाधित असून सुमारे ५०,३११ हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. मंगरूळपीर तालुक्यात ७४ गावे आणि १०,४८९ हेक्टर क्षेत्र, कारंजा तालुक्यात १ गाव आणि ५.९९ हेक्टर क्षेत्र, तर मानोरा तालुक्यात ६ गावे आणि १८५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
जनावरांचे आणि पक्षांचे मृत्यू देखील मोठ्या प्रमाणावर झाले असून, एकूण ३५ जनावरे आणि सुमारे ३,००० कोंबड्या मृत झाल्याची नोंद आहे.
घरांचे नुकसान पाहता, वाशिम तालुक्यात ९७ घरे, रिसोडमध्ये १८४, मालेगावमध्ये ७२, आणि मंगरूळपीरमध्ये ५१ घरे अंशतः पडझड झालेली आहेत. एकूण ४०४ घरे बाधित झाली आहेत.
जमिनीची झीज वाशिम तालुक्यातील ७ गावांमध्ये १६१ हेक्टर तर मालेगाव तालुक्यातील ४ गावांमध्ये ६७ हेक्टर क्षेत्रावर परिणाम झाला आहे. एकूण २२८ हेक्टर जमीन खरडून गेली आहे.
ही आकडेवारी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या गंभीर नुकसानीचे वास्तव दर्शवते.
सरकारची तात्काळ कृती
या गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री भरणे यांनी सांगितले की, “मी स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेवून आहे. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही.”
त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, “आपत्ती मोठी असली तरी राज्य शासन पूर्ण ताकदीने तुमच्या मागे आहे. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर योग्य ती मदत मिळेल.” राजे वाकाटक सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकार आणि प्रशासनाकडून अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने मदतीची कार्यवाही सुरू आहे. पिके, जनावरे, घरे आणि जमिनींच्या नुकसानीवर भरपाई देण्याचे काम प्राधान्याने केले जाणार आहे.