नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. २२ ऑगस्ट २०२५
दिल्लीतील संसद भवन परिसरात शुक्रवारी सकाळी एक गंभीर सुरक्षा त्रुटी उघड झाली. एका तरुणाने भिंतीवरून चढून थेट संसद भवनात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना घडली. हा तरुण थेट गरुड द्वारापर्यंत पोहोचला, मात्र सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला अटक केली.
झाडाच्या साहाय्याने भिंत पार करत संसदेत प्रवेश
सकाळी सुमारे ६.३० वाजता हा तरुण रेल भवनाजवळील भिंतीजवळ दिसून आला. झाडावर चढून त्याने भिंत पार केली आणि संसद परिसरात प्रवेश केला. या भागात नियमित पीसीआर सुरक्षा असतानाही हा प्रकार घडल्यामुळे यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गरुड द्वारापर्यंत पोहोचण्यापूर्वी अटक
भिंती पार करून संसदेत घुसलेला तरुण गरुड दरवाज्यापर्यंत पोहोचला. त्यावेळी परिसरात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी सतर्कता दाखवत त्याचा पाठलाग केला आणि त्याला ताब्यात घेतलं. सीआयएसएफ जवानांनीही या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
तरुण मानसिकदृष्ट्या असंतुलित असल्याचा संशय
प्राथमिक तपासात संबंधित तरुण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी त्याला अटक करून अधिक तपासासाठी स्पेशल सेल आणि गुप्तचर यंत्रणांकडे सोपवलं आहे. आयबीसह इतर सुरक्षा यंत्रणा देखील या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर इशारा
या प्रकारामुळे संसद भवनातील सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इतक्या कठोर सुरक्षा व्यवस्थांमध्येही घुसखोरी शक्य झाल्याने संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू असून, सुरक्षेत अधिक बळकटी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.