कोल्हापूर प्रतिनिधी
दि. २३ ऑगस्ट २०२५
संपूर्ण राज्यात जोरदार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्याला दोन दिवसांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.
प्रमुख मार्गांवर वाहतूक ठप्प
कोल्हापूर जिल्ह्यात १९ ऑगस्ट रोजी सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक मुख्य रस्त्यांवर आणि घाटांवर वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील एसटी सेवा रद्द करण्यात आली. अनुस्कुरा घाटात सकाळी ९ वाजता दरड कोसळल्याने तो मार्गदेखील बंद करण्यात आला होता. मात्र, सकाळी ११ च्या सुमारास दरड हटवल्यानंतर हा घाटमार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
पंचगंगेची पातळी वाढली; बंधारे पाण्याखाली
कोल्हापुरातील नद्यांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून पंचगंगा नदी ३५.४ फुटांवरून वाहत आहे. या ठिकाणी नदीची इशारा पातळी ३९ फूट, तर धोक्याची पातळी ४३ फूट आहे. सध्या जिल्ह्यातील ७३ बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्यात येत आहे.
सांगरूळ-कळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वारणा, तुळशी, धामणी आणि वेदगंगा नद्यांवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. महे/बीड धरण परिसरात वाढत्या पाण्यामुळे वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग
राधानगरी धरण १००% भरल्याने स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत. सध्या धरणातून ११,५०० क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. काळम्मावाडी धरणातूनही ७,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री आदी धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
एसटी सेवा विस्कळीत
पावसामुळे खालील मार्गांवरील एसटी वाहतूक पूर्णतः अथवा अंशतः थांबवण्यात आली आहे:
कोल्हापूर – गगनबावडा (बंद)
वाळवा – बाचणी (गिरगाव मार्गे पर्यायी वाहतूक)
गडहिंग्लज – ऐनापुर (महागाव मार्गे पर्यायी वाहतूक)
उखळू – शितळ (मंदर मार्गे पर्यायी वाहतूक)
चंदगड – भोगोली/पिळणी/धामापूर/हिरे (पर्यायी मार्ग उपलब्ध)
पडळी – पिरळ/शिरगाव (शिरोली/कुडीत्रे मार्गे वाहतूक)
आजरा – देवकांडगाव/सरोली (सोहळे/बाची/महागाव मार्गे वाहतूक)
प्रशासन सतर्क
जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. नदीकिनाऱ्यावरील गावांमधील नागरिकांनी सतर्क राहावे, घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आणि अग्निशमन दल परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.