नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. २३ ऑगस्ट २०२५
टिकटॉक हे लोकप्रिय अॅप भारतात पुन्हा सुरु होणार असल्याच्या चर्चांना सध्या वेग आला आहे. भारत-चीन संबंध पुन्हा सुधारण्याच्या दिशेने जात असल्यामुळे ही शक्यता अधिक चर्चेत आली आहे. मात्र, या चर्चांवर केंद्र सरकारने अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली आहे आणि स्पष्ट केलं आहे की सध्या टिकटॉक परत येण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील राजकीय संबंध नव्याने बळकट होण्याची चिन्हं दिसत आहेत. यामुळे काहीजण असा अंदाज लावत आहेत की, पूर्वी बंदी घालण्यात आलेली चिनी अॅप्स पुन्हा भारतात सुरू होऊ शकतात.
पाच वर्षांपूर्वी भारत-चीन सीमेवरील तणाव आणि झडपीनंतर भारत सरकारने २६७ चिनी अॅप्सवर सुरक्षा व गोपनीयतेच्या कारणास्तव बंदी घातली होती. यात टिकटॉक, शीन आणि अली एक्सप्रेससारख्या अॅप्सचा समावेश होता. आता या अॅप्सवरून बंदी उठवली जाण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे.
अलीकडेच भारतात प्ले स्टोअरवर काही चिनी अॅप्स — जसे की झेंडर आणि टॅनटॅन — पुन्हा दिसायला लागली आहेत. या अॅप्सनी सुधारित नियम आणि डेटा सुरक्षा धोरण स्वीकारल्याचे मानले जात आहे. मात्र, टिकटॉक अद्यापही भारतात उपलब्ध झालेलं नाही.
सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, डेटा सुरक्षा हा अजूनही एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो सोडवल्याशिवाय कोणत्याही बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सना परत प्रवेश मिळणार नाही.
मोदींच्या आगामी चीन दौऱ्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी सुधारल्यास, टिकटॉक, अली एक्सप्रेस, शीन यांसारख्या अॅप्सबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.