पुणे प्रतिनिधी :
दि. २३ ऑगस्ट २०२५
भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातून आणखी एका उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावातील तरुण उमेश म्हेत्रे यांनी थेट देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी उमेदवारी दाखल करत अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
उमेश म्हेत्रे यांनी राज्यसभा सचिवालय, नवी दिल्ली येथे निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी. मोदी आणि गिरीमा जैन यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तसेच उमेदवारीसाठी आवश्यक असलेले १५,००० रुपयांचे डिपॉझिटही त्यांनी भरले आहे. हे सगळं उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच घडल्याने राजकीय चर्चांना अधिकच रंग चढला आहे.
संविधानाच्या निकषांची पूर्तता
भारतीय संविधानानुसार उपराष्ट्रपतीपदासाठी ३५ वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक असते. त्याचबरोबर २० प्रस्तावक आणि २० अनुमोदकांची पाठराखण असणे बंधनकारक आहे. उमेश म्हेत्रे यांनी हे सर्व निकष पूर्ण केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना असून, सामान्य युवकही सर्वोच्च पदांसाठी पुढे येऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
गावाच्या सीमांना ओलांडलेली धडपड
उमेशच्या या पावलामुळे सहजपूर गाव आणि दौंड तालुका राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या तरुणाने उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देणे ही अत्यंत दुर्मीळ बाब मानली जाते. त्यामुळे उमेशचे हे पाऊल तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
इतर उमेदवारांची नावे आणि निवडणुकीची पार्श्वभूमी
या निवडणुकीत एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, तर इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी हे उमेदवार आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक होणार असून, ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.
उमेश म्हेत्रे यांची उमेदवारी वैध ठरते का आणि ते या निवडणुकीत काय भूमिका बजावतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र, त्यांच्या या निर्णयाने लोकशाहीच्या दृष्टीने एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पायवाट नक्कीच उघडली आहे.