मुंबई प्रतिनिधी :
दि. २३ ऑगस्ट २०२५
घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून एक आशादायक पाऊल उचलले जात आहे. वस्तू आणि सेवा कर (GST) प्रणाली आणखी सुलभ करण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दिवाळीच्या आधी याबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांना घर खरेदी करता येणे अधिक सुलभ होऊ शकते.
GST प्रणालीत ऐतिहासिक बदल?
२०१७ साली जीएसटी लागू झाल्यापासून अनेक टप्प्यांमध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या. आता सरकार आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे — करस्लॅब्स कमी करून अधिक पारदर्शक आणि सुलभ कर प्रणाली तयार करण्याचा विचार सध्या केंद्र सरकार करत आहे.
नवीन प्रस्तावानुसार बहुतेक वस्तू आणि सेवांवर फक्त दोनच कर दर – ५% आणि १८% – ठेवण्यात येणार आहेत, तर लक्झरी आणि “पाप” वस्तूंवर ४०% विशेष कर आकारला जाईल. यामुळे कर रचना सुलभ होईल, नागरिकांचे कर समजणे सोपे जाईल आणि व्यापारातील अनावश्यक गुंतागुंत कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
या संदर्भातील प्रस्ताव GoM (ग्रुप ऑफ मिनिस्टर्स) च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजूर झाला असून, ३ ते ४ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या GST परिषद बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
घर खरेदीसाठी वातावरण अनुकूल होणार?
GST मध्ये प्रस्तावित बदलांचा सर्वात मोठा फायदा रिअल इस्टेट क्षेत्राला होऊ शकतो. सध्या सिमेंटवर २८%, स्टीलवर १८%, पेंटवर २८%, आणि टाइल्स व सॅनिटरी उत्पादनांवर १८% GST आकारला जातो. हे दर विकासकांचा खर्च वाढवतात आणि परिणामी घरांच्या किमतीवर परिणाम होतो.
जर नवीन कररचना लागू झाली आणि इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) परत मिळू लागला, तर तज्ज्ञांच्या मते घरांच्या किमती २ ते ४% पर्यंत कमी होऊ शकतात. याचा थेट फायदा घर खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांना होणार आहे.
आधीच मिळाले आहेत सवलतीचे संकेत
याआधीच केंद्र सरकारने १२ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता आणि रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात करत कर्ज घेणाऱ्यांना दिलासा दिला होता. आता GST दर सुधारणा ही आणखी एक सकारात्मक पायरी मानली जात आहे.
दिवाळीत मिळणार घर खरेदीचा आनंद?
दिवाळीपूर्वीच या बदलांची अंमलबजावणी झाली, तर सणासुदीच्या काळात घर खरेदी करणाऱ्यांमध्ये मोठी चैतन्यता निर्माण होऊ शकते. सरकारच्या या प्रस्तावामुळे बाजारपेठेत नवे उत्साह संचारू शकतो, आणि अनेकांचे “स्वतःच्या घराचे स्वप्न” अखेर प्रत्यक्षात उतरू शकते.