मुंबई प्रतिनिधी :
२३ ऑगस्ट २०२५
बेस्ट पतपेढी निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने एकत्रितपणे लढत दिली. ठाकरे बंधूंनी अनेक वर्षांनी एकत्र येत निवडणुकीची रणनिती आखली होती. त्यामुळे ही निवडणूक ‘ठाकरे ब्रँड’साठी एक प्रकारची कसोटी मानली जात होती. मात्र निकाल अपेक्षेप्रमाणे न लागता दोन्ही पक्षांचा पराभव झाला.
या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या युतीतून एकही उमेदवार विजयी झाला नाही. त्यामुळे या पराभवाचे पडसाद आता पक्षात उमटायला सुरुवात झाली असून, ठाकरे गटातील एक वरिष्ठ नेता सुहास सामंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष असलेल्या सामंत यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घेत राजीनामा दिला आहे. त्यांच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे.
बेस्ट पतपेढीवर मागील ९ वर्षांपासून ठाकरे गटाची सत्ता होती. मात्र यंदा भाजपचे शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे १४ आणि प्रसाद लाड यांच्या पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
पराभवानंतर सुहास सामंत यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताकद वापरण्यात आल्याचा आरोप केला होता. त्याच वेळी प्रसाद लाड यांनी गेल्या ९ वर्षांत पतपेढीत झालेल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले होते.
या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्याने लढलेल्या दोन वेगवेगळ्या पॅनल्सनी बाजी मारली आहे. तर ठाकरे बंधूंची युती या लढतीत अपयशी ठरल्याने त्याचा परिणाम पक्षाच्या पुढील रणनीतीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.