मुंबई प्रतिनिधी :
दि. २५ ऑगस्ट २०२५
मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येत असताना भारतीय जनता पक्षाने संघटनेत मोठा बदल करत मुंबईत नव्या अध्यक्षाची नियुक्ती केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या बदलाअंतर्गत आमदार अमित साटम यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सध्याचे अध्यक्ष आशिष शेलार हे सध्या मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असल्यामुळे पक्षाने नवा चेहरा पुढे आणण्याचा निर्णय घेतला. याच अनुषंगाने अमित साटम यांच्याकडे ही नवी भूमिका सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “अमित साटम यांचा संघटनात्मक अनुभव मोठा आहे. ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पक्षातील विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत. त्यांना मुंबईतील प्रश्नांची सखोल समज आहे आणि ते अभ्यासू व आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात.”
आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
नव्या अध्यक्षाची घोषणा झाल्यानंतर आशिष शेलार यांनी अमित साटम यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, “अमित साटम हे कोकणाशी नाळ जोडलेले असून खऱ्या अर्थाने मुंबईचे प्रतिनिधी आहेत. संघर्षातून आलेल्या आणि जनसेवेचा ध्यास असलेल्या कार्यकर्त्याला ही संधी मिळणे, हे पक्षाच्या मूल्यांचं प्रतीक आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! गेल्या नऊ वर्षांत मला मुंबईकरांच्या सेवेसाठी काम करण्याची संधी मिळाली. या काळात सर्वांनी मला भरभरून प्रेम आणि साथ दिली, याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.”