पुणे प्रतिनिधी :
दि. २५ ऑगस्ट २०२५
पावसाळी ट्रेकसाठी मित्रांसोबत सिंहगडावर गेलेल्या आणि अचानक बेपत्ता झालेल्या २४ वर्षीय गौतम गायकवाडचा अखेर थरारक शोध लागला. चार दिवसांपूर्वी तानाजी कड्याजवळून गायब झालेला गौतम, रविवारी दरीत अडकलेल्या अवस्थेत जिवंत आढळला. त्याच्या शोधासाठी सुरू असलेली तपासमोहीम आणि पोलीस-स्थानिकांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळालं.
नेमकं काय घडलं होतं?
२० ऑगस्ट रोजी गौतम आपल्या चार मित्रांसह सिंहगडावर गेला होता. सायंकाळी तानाजी कड्याजवळ आल्यानंतर त्याने “लघुशंका करून येतो,” असं सांगून बाजूला गेला. मात्र बराच वेळ झाला तरी तो परतलाच नाही. शोध घेण्यात आला, पण फक्त त्याची चप्पल सापडली. संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास मित्रांनी १०० नंबरवर फोन करून पोलिसांना माहिती दिली.
यानंतर हवेली पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. त्याच दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्याजवळ एका सीसीटीव्हीमध्ये एक तरुण पळत आणि लपत असल्याचे दृश्य दिसल्याने संशय वाढला – हा अपघात होता की बनाव?
शेवटी कशी लागली गौतमची खबर?
२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास काही स्थानिकांनी दरीत हालचाल पाहिली. संशय आल्यावर त्यांनी शोध घेतला आणि गौतम तिथे अडकलेला, पण जिवंत असल्याचं लक्षात आलं. लगेचच त्याला मदत देत गडाच्या वाहनतळाकडे हलवण्यात आलं.
हवेली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खात्री केली आणि त्याला वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. गौतमची प्रकृती सध्या स्थिर असून पुढील उपचार सुरू आहेत.
खरंच अपघात की काहीतरी वेगळं?
सिंहगडाच्या तानाजी कड्यावरून पडल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला, पण सीसीटीव्ही फुटेज आणि काही इतर संशयास्पद बाबी पाहाता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. गौतम खरंच अपघाताने खाली पडला की यामागे दुसरी कोणती योजना होती, हे तपासातून लवकरच स्पष्ट होईल.
गौतम कोण आहे?
गौतम गायकवाड मूळचा साताऱ्यातील फलटणचा असून सध्या हैदराबादमध्ये राहातो. तो मित्र महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे आणि सूरज माळी यांच्यासोबत पुण्यात ट्रेकसाठी आला होता.
अंतिम निष्कर्षासाठी पोलीस तपासाची प्रतीक्षा करावी लागणार असली तरी सुदैवाने एका तरुणाचे प्राण वाचले, हीच सगळ्यात दिलासादायक गोष्ट ठरली आहे.