पुणे प्रतिनिधी :
दि. २६ ऑगस्ट २०२५
पुण्यातील गाजलेल्या खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रोहिणी खडसे यांच्या पती प्रांजल खेवलकर यांची अडचण आणखी वाढली आहे. तपासादरम्यान पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आलं असून, त्यामुळे त्यांचा जामिनासाठीचा मार्ग कठीण झाला आहे.
प्रांजल खेवलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दोन मोबाइलपैकी एका मोबाइलमध्ये असलेलं सीम कार्ड हे इतर व्यक्तीच्या नावावर असल्याचं तपासात आढळून आलं. याच दरम्यान, त्या सीम कार्डच्या मूळ धारकाने जळगावमध्ये टेलिकॉम कंपनीकडे ‘सीम हरवलं’ असल्याचं सांगून डुप्लिकेट सीम घेतलं आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये वापरून व्हॉट्सअॅप सुरू केलं. यानंतर महत्त्वाची माहिती मिळताच ती तात्काळ डिलीट करण्यात आली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार ठोसपणे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न दर्शवतो. त्यामुळे जामीन दिल्यास आरोपी आणखी छेडछाड करू शकतात, अशी स्पष्ट भूमिका पुणे पोलिसांनी न्यायालयात मांडली आहे.
प्रांजल खेवलकर यांच्याविरोधात सध्या जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. पण पोलिसांनी त्यांच्या लेखी उत्तरात या प्रकरणात आणखी गंभीर कलमे लावण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय, केवळ खेवलकरच नव्हे तर त्यांचे जवळचे सहकारी आणि पत्नी रोहिणी खडसे यांच्याविरोधातही कारवाई होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी पुराव्याशी छेडछाड करण्यात आली असून, त्यामागे प्रांजल खेवलकर यांचे निकटवर्तीय असल्याचा संशय आहे. या संदर्भात सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.