मुंबई प्रतिनिधी :
दि. ३० ऑगस्ट २०२५
आझाद मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट शब्दांत इशारा दिला. मराठा समाजासाठी मागण्या तात्काळ मान्य करा, अन्यथा परिणाम गंभीर होतील, असा त्यांचा निर्वाणीचा इशारा होता.
“उपोषणाचा दुसरा दिवस असून, शरीरावर परिणाम होतो आहे. पण मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही. मुख्यमंत्री फडणवीस आणि सरकारने आता कारवाई करून दाखवावी,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी स्पष्ट केलं की, “मराठा समाजाचं जे ओबीसीमध्ये नोंद झालेलं अस्तित्व आहे, त्यानुसारच आमचं म्हणणं आहे. कोणाचं काही काढून घ्या असं आम्ही म्हणत नाही.”
वाहतूक कोंडीबाबत आंदोलकांना आवाहन
दरम्यान, उपोषणस्थळी वाढलेल्या गर्दीमुळे मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला असून, ईस्टर्न फ्री वेसह अनेक मार्गांवर गाड्यांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. याबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्या तरुणांना शांतता आणि शिस्त राखण्याचं आवाहन केलं. “पोलिसांनी दिलेल्या पार्किंगमध्ये गाड्या लावा. रस्त्यावर अडथळा करू नका. मराठा समाजानं संयम दाखवावा, आपण काहीही वाईट करणार नाही, मी शब्द देतो,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
“राजकारण नको, केवळ आरक्षण हवं”
“आम्हाला राजकारण नकोय, फक्त आरक्षण हवंय. मात्र सरकारकडून केवळ राजकीय खेळी सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला. “मुख्यमंत्र्यांना आरक्षण द्यायचं नाही, ते फक्त राजकारण करत आहेत,” असा थेट आरोप करत त्यांनी शासनावर टीका केली.
“संपूर्ण मुंबईत मराठा समाजाचा आवाज”
“मुंबईच्या प्रत्येक भागात आता मराठा समाज पोहोचला आहे. त्यांनी इथे येऊ नये असं कसं म्हणता येईल? पण माझी सगळ्यांना विनंती आहे, काहीही गैरप्रकार करू नका. तुमचं वागणं हे समाजाचं प्रतिबिंब आहे,” असं आवाहन करत त्यांनी आंदोलनकर्त्यांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं.