मुंबई प्रतिनिधी :
दि. ०३ सप्टेंबर २०२५
सुप्रसिद्ध गायक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते राहुल देशपांडे यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात मोठा बदल झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. १७ वर्षांच्या वैवाहिक सहजीवनानंतर राहुल आणि त्याची पत्नी नेहा यांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या घटस्फोटाची अधिकृत प्रक्रिया सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण झाली असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
राहुल देशपांडेंचं वक्तव्य
इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत राहुलने लिहिलं, “प्रिय मित्रांनो, तुम्ही माझ्या आयुष्यात विविध टप्प्यांवर महत्त्वाचा भाग राहिलात. त्यामुळेच माझ्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्याची माहिती मी तुमच्याशी शेअर करतोय. १७ वर्षांच्या सहजीवनानंतर, नेहा आणि मी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमचं जीवन आता स्वतंत्रपणे सुरू करत आहोत.”
मुलीच्या जबाबदारीबाबत स्पष्ट भूमिका
आपल्या मुलीविषयी बोलताना राहुल म्हणतो, “ही माहिती शेअर करण्याआधी मी थोडा वेळ घेतला कारण सर्व कायदेशीर प्रक्रिया शांतपणे पूर्ण व्हाव्यात आणि विशेषतः आमच्या लेकी रेणुकाच्या भल्यासाठी योग्य निर्णय घेता यावा, हे मला महत्त्वाचं वाटत होतं. रेणुका माझ्यासाठी सर्वात आधी आहे आणि मी तिची जबाबदारी स्वीकारणार आहे. नेहाचाही मी आदर राखत सांभाळ करीन.”
नवीन सुरुवातीबद्दल विचार
राहुल पुढे म्हणतो, “आमचं वैयक्तिक नातं जरी आता वेगळं झालं असलं, तरी आम्ही पालक म्हणून एकमेकांशी जोडलेले आहोत आणि एकमेकांबद्दलचा आदर कायम आहे. आमच्यासाठी हा एक नवीन अध्याय आहे.”
पोस्टच्या शेवटी राहुलने चाहत्यांना त्यांच्या निर्णयाचा आणि प्रायव्हसीचा आदर ठेवल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत. “तुमचा समजूतदारपणा आणि आदराचं मी कौतुक करतो. यासाठी मी आपला आभारी आहे,” असंही त्यांनी लिहिलं.
चाहत्यांमध्ये हळहळ
राहुल देशपांडे आणि नेहा यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना आश्चर्य आणि दुःख वाटत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत राहुलला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.