नंदुरबार प्रतिनिधी :
दि. ४ सप्टेंबर २०२५
नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत कलह उफाळून आला असतानाच, भाजपाने एकाच वेळी शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसला जोरदार फटका दिला आहे. स्थानिक पातळीवर वाढलेल्या असमाधानामुळे आणि राजकीय गोंधळाला कंटाळून शिंदे गटातील तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपाचा भगवा धारण केला.
त्याचप्रमाणे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुळाताई पाडवी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनीही भाजपात प्रवेश करत शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस नेत्या डॉ. समिधा नटावदकर यांनीही भाजपात प्रवेश करत पक्षांतराची मालिका अजून तीव्र केली आहे.
शिवसेनेतील नाराजीनं भाजपला मिळाली चाल
नंदुरबारमध्ये शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्यातील वादामुळे स्थानिक कार्यकर्ते संभ्रमात होते. शिवसेना शिंदे गटाकडून भाजप कार्यकर्त्यांना पक्षात घेतल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, आता भाजपनं सडेतोड उत्तर देत शिंदे गटाचे तीन माजी नगरसेवक — संदीप चौधरी, प्रमोद बोडके आणि जयसिंग राजपूत — यांच्यासह शेकडो शिवसैनिकांना सामावून घेतलं.
राष्ट्रवादीला मोठा धक्का – महिला जिल्हाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी भाजपात
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. महिला जिल्हाध्यक्षा मंजुळाताई पाडवी, आदिवासी सेलचे डॉ. राजेंद्र ठाकरे, तसेच विविध तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांसह शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल झाले.
या प्रवेशामुळे तळोदा, नवापूर, अक्कलकुवा आणि नंदुरबार तालुक्यांतील अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाजपची पकड मजबूत झाली आहे.
काँग्रेस नेत्या डॉ. समिधा नटावदकर या देखील भाजपमध्ये
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या डॉ. समिधा नटावदकर यांनीही काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. या प्रवेशामुळे काँग्रेसलाही मानसिक धक्का बसला आहे.
भाजपचा दावा – अजून मोठ्या प्रमाणात होणार पक्षप्रवेश
भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले की, “ही केवळ सुरुवात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते भाजपाच्या संपर्कात आहेत. लवकरच भाजपात आणखी मोठे पक्षप्रवेश पाहायला मिळतील. विरोधकांच्या गोटात आता झेंडा लावायला माणसं उरणार नाहीत.”
राजकीय भूकंपाच्या तयारीत भाजप?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं सुरू केलेल्या इनकमिंग मोहिमेनं विरोधकांची चिंता वाढवली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस — तिन्ही पक्षांचे आधारस्तंभ गमावत चालल्याने महायुतीतील सत्ता समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.