मुंबई प्रतिनिधी :
दि. ०५ सप्टेंबर २०२५
सामान्यतः असं म्हटलं जातं की, प्रत्येक व्यक्तीचा या जगात कुठेतरी एक हमशकल (डुप्लिकेट) असतो. या गमतीशीर विधानाला वैज्ञानिक आधार नसला, तरी कधी कधी ते सत्य असल्याचं सोशल मीडियावरून जाणवतं. नुकताच असाच एक प्रसंग समोर आला आहे, ज्यात माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती चर्चेचा विषय ठरला आहे.
काही महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणेंचा हमशकल सोशल मीडियावर झळकला होता. त्या तरुणाचे नाव दिनेश पवार असून, तो मंदिरांमध्ये कपाळावर लावायच्या गंधाचे ठसे तयार करतो. त्याचा एक व्हिडीओ पंढरपूर वारीदरम्यान प्रसारित झाला होता. आणि आता त्याच दिनेश पवारसोबत देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती एका व्हिडीओत दिसून आला आहे.
dineshpawar5345 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत तो १६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओमध्ये दोघे एकमेकांच्या अगदी शेजारी उभे असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे त्यातील दुसरा व्यक्ती फडणवीस आहेत का, की त्यांचाच हमशकल, याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. मात्र, त्या दुसऱ्या व्यक्तीबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
व्हिडीओ मुंबईत चित्रीत झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी हा ‘फेकवड्या फडणवीस’ म्हणून विनोदी टिप्पणी केली आहे, तर काहींनी त्याला राजकारणात उतरावं, असा सल्लाही दिला आहे.
हे डुप्लिकेट्स समोर आल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. तुम्ही या डुप्लिकेट्सना भेटलात, तर काय प्रतिक्रिया द्याल? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा!