मुंबई प्रतिनिधी :
दि. ०५ सप्टेंबर २०२५
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती, उद्योजक राज कुंद्रा, यांच्याविरोधात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप उघड झाल्यानंतर प्रकरण अधिकच गडद झालं आहे. ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने या दाम्पत्याविरोधात महत्त्वाची कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणात मुंबईतील प्रख्यात उद्योजक दिपक कोठारी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यांनी शेट्टी-कुंद्रा दाम्पत्यावर विश्वास ठेवून केलेली कोट्यवधींची गुंतवणूक वाया गेल्याचा आरोप केला आहे.
आर्थिक भागीदारी की फसवणूक?
तक्रारीनुसार, २०१५ साली राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी Best Deal TV Pvt. Ltd. या ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या विस्तारासाठी निधीची गरज असल्याचे सांगत, कोठारी यांच्याकडून एकूण ६० कोटी रुपये उचलले. सुरुवातीला हा निधी कर्ज स्वरूपात घेण्यात आला आणि नंतर त्याचे गुंतवणुकीत रूपांतर करण्याची विनंती केली गेली. दरमहा व्याजासह मूळ रक्कम परत केली जाईल, असे आश्वासनही दिले गेले.
कोठारी यांनी तक्रारीत नमूद केलं की, एप्रिल २०१५ मध्ये ३१.९५ कोटी रुपये, तर सप्टेंबर २०१५ मध्ये २८.५३ कोटी रुपये, असे दोन हप्त्यांत पैसे संबंधित कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. परंतु व्यवहार पूर्ण होऊनही अपेक्षित परतावा मिळाला नाही. तसेच, निधी वैयक्तिक वापरासाठी वळवण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
पोलिसांची सक्रियता, लूकआऊट नोटीस जारी
प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू करत, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. तसेच, लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे.
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर लवकरच चौकशी अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, मोठ्या रकमेच्या फसवणुकीप्रकरणी हा एक हाय प्रोफाईल तपास ठरणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेचा पुढील तपास आणि न्यायालयीन कारवाई याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.