मुंबई प्रतिनिधी :
दि. ०८ सप्टेंबर २०२५
आशिया कप २०२५ स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होत असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना १४ सप्टेंबरला पार पडणार आहे. काही काळापूर्वी चर्चा होती की भारत हा सामना खेळणार नाही, म्हणजेच पाकिस्तानविरुद्ध बहिष्कार टाकू शकतो. मात्र आता बीसीसीआयने या चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितले की, “केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय संघाच्या सहभागासाठी ठोस धोरण आखले आहे. बहु-संघीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार घेतला जातो.”
ते पुढे म्हणाले की, “पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिल्यास, आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषद भारताविरुद्ध कारवाई करू शकते. यामुळे तरुण खेळाडूंना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने संघ आणि खेळाडूंच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले आहेत.”
सध्याच्या धोरणानुसार, भारत पाकिस्तानसोबत कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नाही, मात्र बहु-संघ स्पर्धांमध्ये सामील होईल. त्यामुळे आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांना कोणताही अडथळा येणार नाही.
१४ सप्टेंबर रोजी या दोन संघांमध्ये गटातील सामना निश्चित असून, दोन्ही संघ सुपर-४ फेरीत पोहोचल्यास २१ सप्टेंबरला पुन्हा आमनेसामने येऊ शकतात. तसेच जर अंतिम फेरीतही हे दोन संघ पोहोचले, तर एकूण तीन वेळा भारत-पाकिस्तान यांच्यात टक्कर होण्याची शक्यता आहे.