पुणे प्रतिनिधी :
दि. १२ सप्टेंबर २०२५
इंदापूर तालुक्यातील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, बांधकाम विभाग, पंचायत समिती इंदापूर, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग या विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी, मा. दत्तात्रय (मामा) भरणे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा दर्जा, प्रलंबित मुद्दे, निधीची स्थिती आणि पुढील कार्ययोजना याविषयी माहिती जाणून घेत कामांच्या गुणवत्तेवर भर देऊन विकासकामे वेळेत आणि पारदर्शकतेने पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या.
इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर कामे जलदगतीने करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. तसेच, इंदापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली समन्वयाने पुढे जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आढावा बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, विविध विभागांचे उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंते तसेच पंचायत समिती, आरोग्य विभाग व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.