पुणे प्रतिनिधी :
दि. १३ सप्टेंबर २०२५
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणाशी संबंधित असलेल्या आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयुषचा खून केल्यानंतर अटकेत असलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांनी आता प्रतिस्पर्धी सोमनाथ गायकवाड उर्फ ‘सोम्या’च्या टोळीवर लक्ष केंद्रीत केल्याचे उघड झाले आहे. या दिशेने पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरसह अन्य फरार आरोपींचा शोध सुरू असून, टोळीच्या सदस्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तपासण्यात येत आहे. या खुनाच्या कटात आणखी कोण सहभागी होते, याचा छडा लावण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरू आहे.
कोठडी वाढवण्यात आली
आयुष कोमकरवर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या यश पाटील आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या अमित पाटोळे यांना विशेष ‘मकोका’ न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांची पोलिस कोठडी २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
न्यायालयीन युक्तिवाद
तपास अधिकारी चेतन मोरे आणि विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी न्यायालयात तपासाची माहिती सादर करत कोठडी वाढवण्याची मागणी केली. यास अॅड. मिथुन चव्हाण, अॅड. प्रशांत पवार व अॅड. मनोज माने यांनी विरोध करत आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली होती. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पोलिस कोठडीत दहा दिवसांची वाढ मंजूर केली.
या प्रकरणाच्या पुढील तपासात पोलिसांनी काही महत्त्वाच्या दिशांवर लक्ष केंद्रीत केले आहे. आयुष कोमकरच्या हत्येपूर्वी आणि नंतर आरोपींनी केलेल्या कॉल्सचे विश्लेषण अद्याप बाकी आहे, त्यामुळे गुन्हा घडण्याआधी कोणत्या संपर्कांचा वापर झाला, हे शोधणे गरजेचे ठरते. तसेच, गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, गोळ्या आणि वाहने अद्याप जप्त करण्यात आलेली नाहीत. ही साधने कोणाकडून मिळाली आणि कुठून आणली गेली, याचा शोध घेणे आवश्यक आहे. याशिवाय, खुनाचा कट नेमका कुठे आणि कसा रचला गेला, त्यामध्ये कोणकोण सहभागी होते, याची चौकशी करणेही तपासासाठी महत्त्वाचे आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींच्या भूमिकेची खातरजमा करण्यासाठीही अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीकडे गंभीरतेने पाहिले जात आहे. या सर्व तपासाच्या दृष्टीने अटक आरोपींची पोलिस कोठडी अत्यावश्यक असल्याचे पोलिस यंत्रणेचे म्हणणे आहे.
दरम्यान, या खुनाच्या प्रकरणी आयुष कोमकरची आई कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. भवानी पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्यानुसार बंडू आंदेकरसह एकूण १३ जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्याचे स्वरूप संघटित गुन्हेगारीशी संबंधित असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करून कठोर कारवाई सुरू केली आहे.