मुंबई प्रतिनिधी :
दि. १३ सप्टेंबर २०२५
मुंबई : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. ‘दशावतार’, ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ हे तीन मराठी चित्रपट एकाच आठवड्यात प्रदर्शित झाले असून, त्यापैकी ‘दशावतार’ने पहिल्या दिवशीच दमदार कामगिरी करत पुढे झेप घेतल्याचं चित्र आहे. अनुभवी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या सशक्त अभिनयामुळे हा सिनेमा चर्चेत आहे आणि प्रेक्षकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
सिनेमाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. त्यातच दिलीप प्रभावळकर यांचा लूक आणि ८१ व्या वर्षी त्यांनी साकारलेली भूमिका विशेष लक्ष वेधून घेत होती. सिनेमाबाबतची उत्सुकता यामुळेच शिगेला पोहोचली होती. याचा थेट परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसून आला. ‘सॅकनिल्क’च्या प्राथमिक अंदाजानुसार ‘दशावतार’ने पहिल्याच दिवशी भारतात ५८ लाख तर वर्ल्डवाइड ६५ लाखांची कमाई केली आहे.
सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंग दरम्यान त्याचे फारसे शो उपलब्ध नव्हते, यावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर निर्मात्यांनी शोची संख्या वाढवण्याचे आश्वासन दिलं आणि त्याची अंमलबजावणीही झाली. त्यामुळे पुढील दिवसांत चित्रपटाची कमाई अधिक वाढण्याची शक्यता आहे.
चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल आणि आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे. एका वेगळ्या विषयाला स्पर्श करत ‘दशावतार’ प्रेक्षकांना विचारप्रवृत्त करणारा सिनेमा ठरत आहे.
एकूणच, पहिल्या दिवशी मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ‘दशावतार’ आगामी दिवसांतही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी चिन्हं आहेत. दिलीप प्रभावळकर यांचा सहजसुंदर अभिनय, प्रभावी कथानक आणि भक्कम स्टारकास्ट यामुळे हा सिनेमा मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं स्पष्ट होतं.