डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. १३ सप्टेंबर २०२५
आशिया कप २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने आपल्या मोहिमेची प्रभावी सुरुवात केली असून, ओमानवर ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तान संघाचं मनोबल उंचावलं असून, पुढील भारतविरुद्धच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर कर्णधार सलमान अली आगाचे विधान विशेष गाजत आहे.
शुक्रवारी झालेल्या ग्रुप अ च्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ७ गडी गमावून १६० धावा केल्या. यामध्ये मोहम्मद हॅरिसने ३९ चेंडूंमध्ये ६६ धावांची जोरदार खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल केली. ओमानचा संपूर्ण डाव केवळ १६.४ षटकांत ६७ धावांत गुंडाळण्यात आला. फहीम अश्रफ, सैम अयुब आणि सुफयान मुकीम यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, त्यामुळे पाकिस्तानचा विजय अत्यंत सहज झाला.
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा म्हणाला, “गोलंदाजी अत्यंत प्रभावी होती आणि मी आमच्या गोलंदाजी युनिटवर पूर्ण समाधानी आहे. आमच्याकडे तीन फिरकीपटू आहेत आणि ते तिघेही वेगळ्या प्रकारचे आहेत. अयुबही त्यात चांगला पर्याय आहे. फलंदाजीमध्ये अजूनही सुधारण्याची गरज आहे. आम्हाला सुरुवातीपासूनच १८० धावांचा टार्गेट होता, पण क्रिकेटमध्ये असं होणं सहज शक्य नसतं.”
त्यानंतर भारताविरुद्धच्या आगामी सामन्याच्या पार्श्वभूमीवर सलमानने एक खळबळजनक विधान केलं. तो म्हणाला, “आम्ही तिरंगी मालिका जिंकली आणि इथेही पहिला सामना सहज जिंकलो. जर आम्ही आमच्या योजना दीर्घकाळ राबवल्या, तर कोणत्याही संघाला हरवू शकतो.” हे विधान करताना त्याचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता आणि अप्रत्यक्षपणे त्याने भारताला खुले आव्हानच दिलं.
१४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानचा सामना भारताशी होणार असून, सलमान अली आगाचं हे वक्तव्य या सामन्याची रंगत आणखी वाढवणार आहे. पाकिस्तानला मिळालेल्या या मोठ्या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला असला, तरी भारतासारख्या बलाढ्य संघासमोर त्यांची खरी कसोटी लागणार हे नक्की.