पुणे प्रतिनिधी :
दि. १५ सप्टेंबर २०२५
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने भाविकांसाठी एक खास उपक्रम हाती घेतला आहे. साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घडवून आणण्यासाठी शिवाजीनगर आगारातून विशेष बससेवा सुरु करण्यात येत आहे. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता ही बस शिवाजीनगर येथून आपल्या यात्रेला सुरुवात करेल.
या तीन दिवसीय यात्रेत कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर, तुळजापूरची तुळजा भवानी, माहूरची रेणुका माता, आणि वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनाचा समावेश आहे. यात्रेचा पहिला मुक्काम तुळजापूरमध्ये असेल. दुसऱ्या दिवशी माहूर येथे दर्शन आणि मुक्काम, तर तिसऱ्या दिवशी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन पुण्याकडे परतीचा प्रवास करण्यात येईल.
यात्रेसाठी सध्या ३० जणांनी बुकिंग केले असून, प्रवाशांची संख्या वाढल्यास अधिक बसची व्यवस्था केली जाणार आहे. पुरुषांसाठी प्रवास भाडे ₹३१०१, तर महिलांसाठी केवळ ₹१५४९ इतके असून, महिलांना ५०% आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली जाणार आहे.
या यात्रेच्या आयोजनाबाबत शिवाजीनगर आगाराचे वरिष्ठ अधिकारी संजय वाळवे यांनी सांगितले की, “भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि श्रद्धेने भरलेला व्हावा, यासाठी ही बससेवा राबवली जात आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर बुकिंग करून या सेवेचा लाभ घ्यावा.”
शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातून या विशेष बस सुटणार असून, नवरात्रोत्सवात देवीदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.