अहिल्यानगर प्रतिनिधी
दि. १५ सप्टेंबर २०२५ :
अहिल्यानगर (नगर) जिल्ह्याचा पूर्व भाग आणि बीड जिल्ह्याच्या पश्चिम भागात गुरुवारी ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळला. परिणामी नद्यांना पूर आला असून, अनेक गावांत पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावांत लोक पुराच्या पाण्यात अडकले असून, जगसून तांडा (ता. पाथर्डी) येथे एक व्यक्ती वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पाथर्डी व आष्टी तालुके सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
पूरपरिस्थिती अधिक तीव्र बनल्याने कडा (ता. आष्टी) येथे लष्कराची मदत घेण्यात आली असून, हेलिकॉप्टरद्वारे अडकलेल्या नागरिकांची सुटका सुरू आहे. काही ठिकाणी आपत्ती निवारण पथक आणि जेसीबीच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. आतापर्यंत अनेक नागरिकांना वाचवण्यात यश आले असून, जीवितहानी टळली आहे, मात्र शेतीचे मोठे नुकसान आणि जनावरांची हानी झाल्याचे समजते.
पाथर्डी तालुक्यातील करंजी, जवखेडे, तिसगाव आणि मढी भागांत पावसाने थैमान घातले असून, गावांचे संपर्क तुटले आहेत. करंजी आणि जवखेडे या गावांतील ७० ते ८० लोक अडकले होते, त्यांची स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या मदतीने सुटका करण्यात आली. करंजी गावात १६ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
पूराचा फटका करंजीतील उत्तरेश्वर मंदिरालाही बसला आहे. ग्रामस्थांच्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणात पूर पूर्वी कधीच आला नव्हता. नदीने आपले पात्र ओलांडून गावात प्रवेश केला असून, पक्क्या घरांतील लोकही अडकले आहेत.
दरम्यान, अहिल्यानगर-जामखेड रस्त्यावरील सारोळाबद्धी पुल वाहून गेला आहे. या मार्गावर तात्पुरत्या पूलाची व्यवस्था होती, तीही वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. चिचोंडी पाटील आणि इतर गावांचा संपर्क अहिल्यानगर शहराशी तुटलेला आहे. नगर–जामखेड मार्गावर कडा भागातही पाणी वाहात असल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
बीड जिल्ह्यातील कडी नदीला पूर आल्याने गावात पाणी शिरले असून, अनेक ग्रामस्थ इमारतींवर चढून मदतीसाठी आर्जव करत होते. परिणामी, थेट लष्कराला पाचारण करून हेलिकॉप्टरद्वारे बचाव मोहीम राबवण्यात येत आहे. आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
दुपारी पावसाने उघडीप दिल्यानं थोडा दिलासा मिळाला असला तरी, बचावकार्य जोरात सुरू आहे.