पुणे प्रतिनिधी :
दि. २२ सप्टेंबर २०२५
राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेले पंढरपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत प्रभाकर बागल (वय ६३, रा. गादेगाव, जि. सोलापूर) यांच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि काडतुसे आढळल्याने पुणे विमानतळावर खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
बागल वाराणसीकडे प्रवास करत होते. सुरक्षा तपासणीदरम्यान त्यांच्या सामानातून एक भारतीय बनावटीची रिव्हॉल्वर, पाच जिवंत काडतुसे आणि एक रिकामे काडतूस आढळले. या घटनेनंतर CISF आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन विमाननगर पोलिसांच्या स्वाधीन केले.
तपासात स्पष्ट झाले की, बागल यांच्याकडे शस्त्राचा परवाना आहे. मात्र तो फक्त महाराष्ट्र राज्यापुरता वैध असून, इतर राज्यात शस्त्र नेण्यासाठी स्वतंत्र परवानगी आवश्यक असते. ती परवानगी न घेतल्याने हे परवाना नियमांचे उल्लंघन ठरले. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या तक्रारीवरून विमाननगर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी त्यांच्या रिव्हॉल्वरसह शस्त्रसाठा जप्त केला असून, पुढील चौकशीसाठी बागल यांना नोटीस बजावण्यात आली आहे. चौकशीनंतर त्यांना प्रवासासाठी परवानगी देण्यात आली.
चंद्रकांत बागल हे व्यवसायाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून, २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. याआधी ते सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्यही राहिले आहेत.