मुंबई प्रतिनिधी :
२२ सप्टेंबर २०२५ :
दुबईत सुरु असलेल्या आशिया कप २०२५ च्या सुपर-४ टप्प्यात भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून दमदार विजय मिळवला. १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने केलेल्या आक्रमक खेळीने सामन्याचे पारडे भारताकडे झुकवले.
सामना संपल्यानंतर अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या खेळाडूंबाबत उघडपणे प्रतिक्रिया दिली. “सामन्यादरम्यान पाकिस्तानचे काही खेळाडू उगाच डिवचत होते. मला ते अजिबात पटले नाही, म्हणून मग मीही त्यांच्या मागेच लागलो,” असं तो म्हणाला. त्याने पुढे सांगितले की, “शुभमनसोबत अशी भागीदारी करण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. संघाच्या पाठिंब्यामुळे मी आक्रमक खेळ करू शकतो, जरी त्यात धोका असला तरी.”
भारताने १९.१ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. अभिषेक शर्माने केवळ ३९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावा फटकावल्या. शुभमन गिलने ४७, तर तिलक वर्माने नाबाद ३० धावा करून भारताचा विजय सुनिश्चित केला. अभिषेक शर्माला सामन्याचा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.
पाकिस्तानकडून हारिस राऊफने २६ धावांत २ गडी बाद केले, तर फहीम अश्रफने ३१ धावांत १ गडी बाद केला, पण भारतीय फलंदाजांच्या आक्रमणास ते रोखू शकले नाहीत. विशेष म्हणजे, या सामन्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता सामन्याचा शेवट केला.
सुपर-४ मध्ये भारताने विजयाने सुरुवात करताच चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.