बारामती प्रतिनिधी :
दि. २२ सप्टेंबर २०२५
राज्यात यावर्षी मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सध्या देखील अनेक भागांमध्ये हवामानामुळे शेतीचे नुकसान सुरू आहे. यासंदर्भातील पंचनामे सुरू असून, येत्या दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असा दिलासा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शेतकऱ्यांच्या अडचणी, नुकसानभरपाई आणि कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
कर्जमाफीबाबत विश्वास – निर्णय योग्य वेळी
कर्जमाफीबाबत विचारणा झाल्यावर भरणे म्हणाले की, शेतकरी सध्या संकटात आहे — कुठे दुष्काळ, कुठे अतिवृष्टी तर कुठे गारपीट. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वेळेवर निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजकारणात व्यक्तिगत टीका नको
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेवरही भरणे यांनी मत व्यक्त करताना सांगितले, “राजकारणात व्यक्तिगत टीका करणं योग्य नाही. प्रत्येकाने संयम पाळावा.” या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिल्याचेही त्यांनी सांगितले.