नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. २२ सप्टेंबर २०२५
देशात आजपासून लागू होणाऱ्या नव्या जीएसटी दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधानांनी याला ‘बचत उत्सव’ असे संबोधले. त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरातील आयकर सवलती आणि **जीएसटी कपातीच्या निर्णयांमुळे देशातील नागरिकांची तब्बल २.५ लाख कोटी रुपयांची बचत होणार आहे.
विकसित भारतासाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग
पंतप्रधान मोदी म्हणाले, “विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारणं आवश्यक आहे. आपले एमएसएमई (लघु, मध्यम व कुटीर उद्योग) हे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. देशात जी उत्पादने तयार होऊ शकतात, ती आपण इथेच तयार केली पाहिजेत.”
मध्यमवर्गाला ‘डबल बोनांझा’
सरकारने यावर्षी १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री करून मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला आहे. यासोबतच नव्या जीएसटी दरांमुळे घर, दुचाकी, चारचाकी, टीव्ही, फ्रीज यांसारख्या वस्तूंवर खर्च कमी होणार असून, अनेकांसाठी स्वप्नपूर्ती सहज शक्य होणार आहे. पर्यटनही अधिक परवडणारे होईल, कारण हॉटेलमधील खोल्यांवरील जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांमध्ये उत्साह, ग्राहकांसाठी ‘देवो भव’
पंतप्रधान मोदी म्हणाले, “व्यापाऱ्यांमध्ये नव्या जीएसटी दरांबद्दल उत्साह आहे. अनेक ठिकाणी जुन्या आणि नव्या जीएसटी दरांचे फलक लावले जात आहेत, जेणेकरून ग्राहकांना प्रत्यक्ष लाभ मिळेल. आम्ही ‘नागरिक देवो भव’ या भावनेने पुढे जात आहोत आणि नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म त्याचे उत्तम उदाहरण आहे.”
नवीन कर धोरणामुळे देशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची आणि नागरिकांच्या खिशावरचा भार काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असून, आगामी काळात याचे व्यापक परिणाम दिसून येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.