मुंबई प्रतिनिधी :
दि. २२ सप्टेंबर २०२५
महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना (शिंदे गट)च्या मंत्र्यांची कार्यशैली आणि पक्षसंघटनेबाबतची उदासीनता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता थेट कारवाईचा इशारा दिला आहे. ‘निर्मल भवन’मध्ये झालेल्या गुप्त बैठकीत त्यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना कडक शब्दांत सुनावलं. “काम करत नसाल, तर विचार करावा लागेल,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कार्यशैलीवर नाराजी, पक्षकामाकडे दुर्लक्ष खपवून घेतलं जाणार नाही
शिंदे यांनी मंत्र्यांना स्पष्ट सांगितलं की, फक्त मंत्रालयात बसून चालणार नाही, जनतेत उतरावं लागेल. जनता दरबार, जिल्हा भेटी, संघटनात्मक कामं याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंत्र्यांवर शिंदे यांचा रोष आहे. “सत्तेत आल्यावर जबाबदाऱ्या वाढतात, अधिकारांसोबत कर्तव्यही आहेत,” असे सांगत त्यांनी मंत्र्यांची कानउघडणी केली.
मंत्रिपद धोक्यात? शिंदे गटात खळबळ
शिंदे गटाचे अनेक मंत्री सत्तेवर आल्यानंतर वादग्रस्त ठरले आहेत. याचा परिणाम लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिसून येईल, अशी भीती पक्षश्रेष्ठींना वाटू लागली आहे. त्यामुळेच शिंदे यांनी आता स्वतः पुढाकार घेत मंत्र्यांना वळणावर आणण्याची मोहीम सुरू केली आहे.
‘काम करा, नाहीतर खुर्ची जाईल’ – अजित पवारांचा ही इशारा आठवणीत
याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांना कार्यक्षमतेबाबत कडक शब्दांत ताकीद दिली होती. पालकमंत्री असूनही जिल्ह्यांमध्ये न फिरकणाऱ्या मंत्र्यांना त्यांनी सुनावलं होतं — “फक्त तोंड दाखवायला येऊ नका; काम नसेल तर खुर्ची सोडायला तयार रहा.”
कॅबिनेटनंतर खास बैठक, शिंदेंचा कठोर सूर
गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महायुती सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतर शिंदे यांनी फक्त त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी त्यांनी अनेक मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेबाबत तक्रारी मिळाल्याचं सांगत, तात्काळ सुधारणा न झाल्यास कठोर निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं.