पुणे प्रतिनिधी :
दि. २३ सप्टेंबर २०२५
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांत होणार असल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशात पुण्यात झळकलेल्या एका खास बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. या बॅनरमध्ये संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसत असल्याने, दोन गटात विभागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एकत्र येण्यावर पुन्हा एकदा बोललं जाऊ लागलं आहे.
नुकतेच नागपूरमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचं एक शिबिर पार पडलं. त्या शिबिरात पक्षाच्या माजी नगरसेवकाने “झालं गेलं विसरून जा, ताई-दादा पुन्हा एकत्र या” असा मजकूर असलेला एक बॅनर लावला होता. त्यानंतर आता पुण्यात सुद्धा असाच एक बॅनर सिटी प्राईड चौकात झळकला आहे. या बॅनरवर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा एकत्र फोटो असून, “आम्ही एकत्रच! विचार वेगळे असले तरी कुटुंब एकत्र आहे. गरज पडल्यास ताई-दादा एकत्र येणार – आमचा विश्वास” असा उल्लेख आहे.
हे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी लावले असून, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळं होत भाजप-शिवसेना सरकारमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ‘राष्ट्रवादी’ हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळालं. दोन्ही गटांमध्ये अनेकदा टोकाची टीका झाली, तर काही वेळा एकत्रही दिसून आले. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमनेसामने उभ्या राहिल्या, तर विधानसभा लढतीत युगेंद्र पवार आणि अजित पवार आमनेसामने आले.
तरीही कौटुंबिक कार्यक्रमांत पवार कुटुंब अनेकदा एकत्र दिसल्याने, कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही गट एकत्र येतील का? अशी आशा सतत व्यक्त केली जात आहे. आता नागपूर आणि पुण्यात झळकलेल्या बॅनरमुळे हीच चर्चा पुन्हा जोमात सुरू झाली आहे.