मुंबई प्रतिनिधी :
दि. २३ सप्टेंबर २०२५
राज्यात येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पावसात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी आपली काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
२४ सप्टेंबरपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रात २८ सप्टेंबरपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
२२ ते २५ सप्टेंबरदरम्यान, काही भागांमध्ये वादळ आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून तो मुख्यतः दुपारनंतर होईल. विशेषतः २६ तारखेपासून विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व आणि दक्षिण भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
२७ सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर २८ तारखेला राज्याच्या पश्चिम भागांमध्येही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन योग्य प्रकारे करावे, तसेच काढणी केलेली पिके वाचवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.