जालना प्रतिनिधी :
दि.२४ सप्टेंबर २०२५
आज जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसनाग्रस्त झालेल्या भागाची पाहणी, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे करत आहेत. त्यांनी बदनापुर तालुक्यातील सोमठाणा गावात शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. एकट्या जालना जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात ६३८,३७७ एकर क्षेत्र बाधित झालं आहे. गेल्या आठ-दहा दिवसात प्राथमिक अंदाजानुसार ४ लाख एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. दुस-या टप्प्यात जालना जिल्ह्यात प्रचंड शेत पिकांचं नुकसान झालेलं दिसून येतंय.शिवारात पिकं पडलीत, वाहून गेलीत. शेतक-यांच्या आयुष्याचं स्वप्न या पाण्यात वाहून गेलंय, अशी परिस्थिती आहे. मदत तातडीने पोहोचलीच पाहिजे म्हणून जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करुन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश भरणे यांनी दिले आहेत.
याप्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले, “राज्याचा कृषी मंत्री म्हणून या सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी मी ठाम उभा आहे. तसंच शासनाची भूमिका शेतक-याला आधार देण्याचीच असून नुकसानीचे पंचनामे होऊन प्रस्ताव सादर होत आहेत. तश्याप्रकारे मदतनिधीचे शासन निर्णय निघत आहेत. संकटाच्या या काळात आपण सारे शेतकऱ्यांसोबत उभं राहूयात!”