जालना प्रतिनिधी :
दि. २४ सप्टेंबर २०२५
मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतजमिनींचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पीक भिजून गेले असून काही ठिकाणी जमीन खरडूनही गेली आहे. या पार्श्वभूमीवर काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. त्यानंतर आज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते.
मात्र, शेतकरी या दौऱ्याच्या वेळी संतप्त झाले. त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत कृषीमंत्र्यांना चांगलंच प्रश्नांच्या कोंडीत पकडलं. “आमचं नुकसान झालं, पण आजपर्यंत पंचनामेच झाले नाहीत”, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी आक्रमकपणे मांडल्या.
या तक्रारी ऐकून कृषीमंत्री भरणे यांनी तात्काळ संबंधित महसूल अधिकाऱ्याला फोन लावला आणि त्याला फटकारलं. “ज्यांचं पीक वाहून गेलं आहे, जमीन खरडली आहे, जनावरं मेली आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित पूर्ण करा. एकाही शेतकऱ्याचं नुकसान विना पंचनाम्याचं राहू नये. अन्यथा जबाबदारी तुमच्यावर असेल,” अशा कडक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्याला सुनावलं.
शेतकऱ्यांची ठाम मागणी – ‘तुटपुंज्या मदतीपेक्षा योग्य भरपाई द्या’
शेतकऱ्यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सरकारकडून येणाऱ्या २-३ हजार रुपयांच्या तुटपुंज्या मदतीवर नाराजी व्यक्त केली. “आमचं नुकसान लाखोंमध्ये झालं आहे. हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत मिळायला हवी,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.
त्यावर कृषीमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करत सांगितले की, “सरकार तुमच्या पाठीशी आहे. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळवून दिली जाईल. पंचनाम्यानंतर मदतीत कोणतीही अडचण येऊ देणार नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
मुख्यमंत्र्यांची माहिती – आतापर्यंत २२१५ कोटींची मदत मंजूर
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यात पूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना एकूण २२१५ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. यातील १८२९ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वितरित करण्यात आले असून मदतीच्या निकषांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, “सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पंचनामे पूर्ण होताच मदतीचे आदेश लगेच दिले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना मृत्यू, जनावरांचे व घरांचे नुकसान यासाठी तातडीने मदत वितरित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनालाही त्वरित निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मराठवाड्यातील शेतकरी सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहेत. सरकारने मदतीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात मदत पोहोचवण्यात अडथळे असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळेच मंत्री दौऱ्याच्या वेळी त्यांच्या भावना तीव्रपणे व्यक्त झाल्या. कृषीमंत्री भरणे यांनी प्रशासनावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त करत त्वरेने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. आता पाहावं लागेल की ही मदत किती लवकर व प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते.