जालना प्रतिनिधी :
दि. २४ सप्टेंबर २०२५
जालना जिल्ह्यातील बदनापूर आणि अंबड तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. सलग पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि शेतीसंबंधित साधनसामग्रीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री भरणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला.
पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर यांसारख्या पिकांचे नुकसान, पाण्यामुळे शेतात साचलेले गाळ आणि वाहून गेलेली जमीन याची माहिती मंत्र्यांना दिली. तसेच विहिरी, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांनाही फटका बसल्याचं निदर्शनास आलं.
या दौऱ्यात मंत्री भरणे यांनी प्रशासनाच्या कामकाजातील ढिलाईवर नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून स्पष्ट शब्दांत निर्देश दिले.
“एकही गुंठा क्षेत्र पंचनाम्याविना राहता कामा नये. खरडून गेलेली जमीन, विहिरी, जनावरांचे नुकसान – सर्व बाबींचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा. जर कोणी वंचित राहिला, तर त्याची जबाबदारी प्रशासनावर असेल,” असा इशारा त्यांनी दिला.
शासनाची गंभीर दखल; युद्धपातळीवर पंचनामे सुरू
मंत्री भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त जालना जिल्ह्यातच ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान २ लाख ५५ हजार हेक्टर (सुमारे ६.३८ लाख एकर) शेतीचे नुकसान झालं आहे. यातील बहुतांश नुकसान सप्टेंबर महिन्यात झालं असून पावसाचा जोर जास्त असल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
राज्याच्या पातळीवर पाहता, ३३.५१ लाख हेक्टर म्हणजेच सुमारे ८३.७७ लाख एकर क्षेत्रावर अतिवृष्टीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. या भागांमध्ये खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे.
मुख्यमंत्र्यांचं लक्ष; शासन तात्काळ मदतीसाठी कटिबद्ध
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही राज्यातील विविध भागांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेत असून, संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
मंत्री भरणे म्हणाले की, “शेतकऱ्यांना न्याय मिळणं ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कुणालाही मदतीपासून वंचित ठेवणार नाही. पंचनामे पूर्ण होताच मदत तत्काळ वितरित केली जाईल,” असं आश्वासनही त्यांनी दिलं.