शेवगाव प्रतिनिधी :
दि. २४ सप्टेंबर २०२५
गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. अशातच आज कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या भातुर गावाला भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. मुसळधार पाऊस पडल्याने सीना, खैरी, ढोरा, नंदिनी नद्यांना पूर आला आहे. पुराने अनेक गावे आपत्तिग्रस्त झाली असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतात, घरात पाणी घुसल्याने प्रचंड हानी झाली आहे.
भातुर गावाची पाहणी करत असताना अहिल्यानगरच्या दक्षिण भागातील अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानाची माहिती त्यांनी घेतली. अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील १४ तालुके बाधित झाले असून ७५५ गावांचं नुकसान झालं आहे. यात एकूण ३,२३,१९६ शेतकऱ्यांना नुकसान झेलावं लागलं आहे. तर, मुसळधार पाऊस पडल्याने सीना नदीला पूर आला असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडत त्वरित मदत करण्याची मागणी भरणे यांच्याकडे केली. या कठीण प्रसंगी शेतकऱ्याला कुठेही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही असा विश्वास देत भरणे यांनी, लवकरच पंचनामे पूर्ण करून योग्य मदत केली जाईल असे आश्वस्त केले.