अहिल्यानगर प्रतिनिधी :
दि. २४ सप्टेंबर २०२५
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात गेल्या तीन दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पाऊस पडत आहे. पाथर्डीतील ९ पैकी ८ मंडलांत अतिवृष्टी झाली. तेथील टाकळी व खरवंडी या दोन मंडलात १५५ मिमी पावसाची नोंद आहे. आज पाथर्डी तालुक्यातील करंजी या नुकसानग्रस्त गावाला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडत लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांचेकडे केली. या कठीण प्रसंगी शेतकऱ्याला कुठेही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही असा विश्वास देत लवकरच पंचनामे पूर्ण करून योग्य मदत केली जाईल असे कृषिमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान हे पाथर्डी तालुक्यात झालं असून तब्बल ७७ हजार १५५ हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं आहे. यामध्ये १३७ गावांमधील १ लाख १ हजार ५८० शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. पुराच्या पाण्याने पाथर्डीतील पूल, रस्ते वाहून गेले आहेत. मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील सीना, खैरी, ढोरा, नंदिनी नद्यांना पूर आल्याने अनेक गावे आपत्तिग्रस्त झाली असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतात, घरात पाणी घुसल्याने प्रचंड हानी झाली आहे.
पाथर्डी तालुक्यात पाहणी करत असताना शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा कृषी मंत्र्यांकडे मांडल्या. तसेच भरीव मदत करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली. पंचनामे पूर्ण होताच त्वरित शासन निर्णय काढून योग्य ती मदत करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी शेतकर्यांना दिलं.