कोल्हापूर प्रतिनिधी :
दि. २४ सप्टेंबर २०२५
गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहात २३ सप्टेंबर रोजी हा सोहळा पार पडला.
नेतृत्वाचा मोठा आधार
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डोंगळे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला. कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर या प्रवेशाचा मोठा परिणाम होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
हसन मुश्रीफ: “शंभर हत्तींचं बळ मिळालं”
मंत्री हसन मुश्रीफ यांनी डोंगळेंच्या प्रवेशाचा उल्लेख करताना म्हटलं की, “राष्ट्रवादीला शंभर हत्तींचं बळ मिळालं आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये याचा मोठा फायदा होईल.”
संघटन कौशल्याला मान्यता
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी डोंगळे यांच्या सहकार आणि शेतकरी क्षेत्रातील अनुभव पक्षासाठी उपयुक्त ठरेल, असं सांगितलं. “कोल्हापुरातील संघटन अधिक बळकट होईल आणि पक्षाला भक्कम आधार मिळेल,” असे ते म्हणाले.
डोंगळे ठाम; “संघटन घट्ट करणार”
पक्षप्रवेशानंतर डोंगळे यांनी सांगितले की, “राष्ट्रवादीच्या बळकटीकरणासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. संघटन मजबूत करून निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी आहे.”
शिवसेनेपासून राष्ट्रवादीकडे वळलेलं नेतृत्व
मागील काही काळात डोंगळे शिवसेनेच्या संपर्कात होते, मात्र शेवटी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय पटलावर नवे समीकरण उभे राहात आहे. सहकारी क्षेत्रात डोंगळेंचा प्रभाव असल्याने राष्ट्रवादीला स्थानिक राजकारणात नवी उर्जा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोकुळवरून नव्या संघर्षाची चाहूल
गोकुळ दूध संघासह कोल्हापूरच्या सहकारी क्षेत्रात वर्चस्वासाठी आता राष्ट्रवादीने ताकदीनिशी तयारी सुरू केली आहे. यामुळे काँग्रेस, शिवसेना व भाजप यांना नव्या आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असून, कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय बदलाचा नवा अध्याय सुरु होतो आहे.