जालना प्रतिनिधी :
दि. २५ सप्टेंबर २०२५
जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या मोठ्या नुकसानीची पाहणी करताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, “काळजी करू नका, शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे.”
बदनापूर तालुक्यातील सोमठाणा व अंबड तालुक्यातील ढाकलगाव परिसरातील शेती शिवारात स्वतः जाऊन मंत्री भरणेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर थेट भेट देत त्यांनी त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. या वेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
माध्यमांशी बोलताना कृषिमंत्री भरणे म्हणाले, “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक हातातून गेले आहे. विशेषतः कपाशी, सोयाबीन यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही भागांमध्ये घरांची पडझड व जनावरांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, हे शासनाचे धोरण आहे.”
ते पुढे म्हणाले, “राज्य शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदतीचे वाटप करण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय ठेवून तात्काळ पंचनामे पूर्ण करावेत आणि प्रस्ताव सादर करावा. अहवाल मिळाल्यानंतर कोणतीही विलंब न करता नुकसान भरपाई दिली जाईल.”
गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात सततच्या पावसाने शेती पाण्याखाली गेली असून अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. याची गंभीर दखल घेत कृषिमंत्र्यांनी प्रशासनाला वेळ न दवडता कृती करण्याचे निर्देश दिले.
या दौऱ्यात कृषिमंत्र्यांसोबत आमदार नारायण कुचे, महसूल, कृषी, पशुसंवर्धन विभागांचे अधिकारी, तसेच कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेवटी, “संकटाच्या काळात शासन तुमच्या सोबत आहे, आणि या लढ्यात तुम्ही एकटे नाही,” अशा शब्दांत कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.