वाशिम प्रतिनिधी :
दि. २६ सप्टेंबर २०२५
“शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी २ हजार २१५ कोटींचा मदत निधी जाहीर केला आहे. यातून, १४५ कोटी ३५ लाख ४३ हजारांचा निधी वाशिम जिल्ह्यासाठी मंजुर केला आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात झालेल्या नुकसानासाठी ही मदत देण्यात आली आहे. यात, जुलैचे १ कोटी ७१ लाख ३९ हजार रुपये तर ऑगस्टचे १४३ कोटी ६४ लाख ४ हजार रुपये असे एकूण १४५ कोटी ३५ लाख ४३ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. DBT पोर्टलद्वारे मदत निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार असून सप्टेंबरची मदत लवकरच मंजूर होईल.” अशी माहिती कृषी मंत्री आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानभरपाई जाहीर केली आहे. खरीप २०२५ मधील पिकांच्या नुकसानीसाठी २२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबतचा शासन निर्णय काढला असून, ही रक्कम कालपासूनच वितरीत होण्यास सुरवात झाली आहे.
कृषि मंत्री आणि वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एकूण १ लाख ६९ हजार २८४ हेक्टरचं नुकसान झालं आहे. तर, २ लाख १ हजार ८२४ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पंचनाम्याची आकडेवारी लक्षात घेता शासनाने १४५ कोटी ३५ लाख ४० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिन्यात आता पर्यंत ३८ हजार ५४१ हेक्टरचं नुकसान झालं आहे. चालू महिन्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे शेवटच्या टप्यात आले असून लवकरच मदत निधी जाहीर केला जाणार आहे.