मुंबई प्रतिनिधी :
०४ ऑक्टोबर २०२५
झुबिन गर्ग यांच्या निधनाची घटना आता फक्त अपघात नव्हे, तर एका योजनाबद्ध हत्येचा भाग असल्याचा नवा दावा पुढे आला आहे. त्यांच्या बँडमधील सदस्य शेखर ज्योती गोस्वामी यांनी गंभीर आरोप करत सांगितले की गर्ग यांच्या मृत्यूमागे सखोल कट होता आणि त्यांना विष देण्यात आले होते.
सिंगापूरमधील घटना आणि संशयास्पद हालचाली
गोस्वामी यांच्या मते, सिद्धार्थ शर्मा आणि श्यामकानू महंत या दोघांनी गर्ग यांना विष देऊन त्यांचा बळी घेतला. त्यांनी सांगितले की, गर्ग यांच्या मृत्यूला अपघाती दाखवण्यासाठी सिंगापूरची निवड करण्यात आली होती. गर्ग बुडत असताना त्यांच्या तोंडातून फेस येत होता आणि शर्माने “जाबो दे, जाबो दे” असे म्हणत मदत न करण्याची सूचना दिली होती, असा आरोपही त्यांनी केला आहे. गर्ग यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळाली असती, तर त्यांचा जीव वाचू शकला असता, असा दावा गोस्वामी यांनी केला. परंतु, शर्माने ही लक्षणे ‘अॅसिड रिफ्लक्स’ म्हणून दुर्लक्षित केली. यामुळे गर्ग यांचा मृत्यू झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. अहवालानुसार, शर्मा यांनी इतरांना पेय देण्यापासून रोखून स्वतःच झुबिनसाठी ड्रिंक तयार केले. तसेच, बोटीत घडलेल्या घटनेचे कोणतेही व्हिडिओ फुटेज शेअर करू नये, असेही स्पष्ट आदेश दिले होते.
झुबिन गर्ग यांचा जलतरण कौशल्यावर संशय नाही
गोस्वामी यांनी स्पष्ट केले की झुबिन हे कुशल जलतरणपटू होते, त्यामुळे ते सहज बुडू शकत नाहीत. त्यामुळे हा अपघात नसून कट रचून केलेली हत्या असल्याची शक्यता अधिक आहे, असे त्यांचे मत आहे.
विशेष तपास पथकाने या प्रकरणात गर्ग यांच्यासोबत सिंगापूरला गेलेल्या तिघांची चौकशी सुरू केली आहे. त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास अधिक खोलवर चालू आहे.
झुबिन गर्ग यांचे १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये निधन झाले होते. नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल (NEIF) कार्यक्रमाच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनात बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले गेले होते, परंतु आता या प्रकरणाला खुनाचे वळण मिळाल्याने नवा तपास सुरू झाला आहे.
.