अहमदाबाद प्रतिनिधी :
दि. ०४ ऑक्टोबर २०२५
वेस्ट इंडिजविरुद्ध, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने आपली पकड भक्कम केली आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारताने केवळ पाच गडी गमावत ४४८ धावा फटकावल्या असून, यजमान संघाला २८६ धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. या धावसंख्येमुळे फलंदाजांनी आपले काम उत्तमरित्या पार पाडले आहे. आता भारतासाठी निर्णायक क्षण येणार आहे – गोलंदाजांची कसोटी.
दुसऱ्या दिवशी झालेल्या जबरदस्त कामगिरीमुळे भारत तिसऱ्या दिवशी सामन्यावर शिक्कामोर्तब करू शकतो, पण यासाठी एक गोष्ट अत्यावश्यक आहे – गोलंदाजांनी दोन सत्रांत वेस्ट इंडिजचे १० फलंदाज बाद करणे. भारत तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात उरलेल्या फलंदाजांच्या जोरावर धावसंख्या सुमारे ६०० पर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे वेस्ट इंडिजपुढे जवळपास ४५० धावांचे मोठे आव्हान असेल. आणि जर भारतीय गोलंदाजांनी लवकरच आक्रमक मारा केला, तर तिसऱ्याच दिवशी सामना जिंकण्याची मोठी संधी मिळू शकते.
या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. के. एल. राहुल आणि रवींद्र जाडेजा यांनी दमदार शतके झळकावली, परंतु विशेष लक्ष वेधून घेतले ते यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलच्या खेळीने. २४ वर्षीय जुरेलने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक साजरे करत १२५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत संधी मिळाल्यानंतर जुरेलने स्वतःला सिद्ध करत हा सामना आपल्या नावावर कोरला.
त्याच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य म्हणजे संयम, चपळता आणि परिस्थितीची अचूक समज. उत्तम चेंडूंना आदर देताना चुकांवर धावा मिळवणं, आणि गरज पडल्यास टी-२० शैलीत आक्रमण करणे – हे जुरेलचे फलंदाजीतील संतुलन दिसून आले. काही महिन्यांपूर्वी IPL मधील अपयशानंतर टीकेचे लक्ष्य बनलेल्या जुरेलने या सामन्यात तीव्र मेहनतीचे फळ घेतले. मैदानात उतरताना नम्रतेने वाकून नमस्कार करणारा आणि खेळात एकाग्रता टिकवण्यासाठी उजवा हात छातीवर ठेवून ध्यानधारणा करणारा जुरेल आता भारतीय संघाचा महत्वाचा आधारबिंदू ठरत आहे.
आपली शतकी खेळी त्यांनी भारतीय जवानांना अर्पण केली, हे विशेष उल्लेखनीय. अशा आत्मविश्वासू आणि प्रेरणादायी कामगिरीच्या जोरावर भारताने सध्या सामन्यावर वर्चस्व मिळवले आहे. आता गोलंदाजांनी आपली भूमिका योग्य पार पाडली, तर भारताला तिसऱ्याच दिवशी ऐतिहासिक विजय मिळू शकतो.