मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ ऑक्टोबर २०२५
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चर्चेतील जोडपं विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या नात्याबाबत अखेर ठोस माहिती समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून त्यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा सिनेसृष्टीत सुरू होती, मात्र आता त्यांच्या गुप्त साखरपुड्यामुळे या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.
M9 न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि रश्मिकाने अत्यंत खासगी समारंभात आपल्या नात्याला अधिकृत रूप दिलं. या सोहळ्यात फक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि अतिशय जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. ‘गीता गोविंदम’मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेली ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या, पण त्यांनी कधीही उघडपणे त्यावर भाष्य केले नव्हते.
तरीही दोघं अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत होते. शिवाय सोशल मीडियावर त्यांच्या एकाच ठिकाणी घेतलेल्या फोटोंनीही त्यांच्या जवळीकतेला पुष्टी दिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरपुड्यानंतरही हे जोडपं काही काळ लग्नाची अधिकृत घोषणा लांबवणार आहे.
दरम्यान, इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, विजय आणि रश्मिका फेब्रुवारी २०२६ मध्ये विवाहबद्ध होणार असल्याचे समजते. अद्याप त्यांच्या कडून कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नसली, तरी सोशल मीडियावर ही बातमी धुमाकूळ घालत आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिकाने साडीतील काही फोटो शेअर केले होते. हे फोटो तिच्या साखरपुड्याच्याच असल्याची जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.
या बातमीने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. सध्या सर्वांच्या नजरा त्यांच्या अधिकृत घोषणेकडे लागून राहिल्या आहेत.
कार्यक्षेत्रातही दोघं सक्रिय –
रश्मिका सध्या बॉलिवूडमध्ये देखील आपली छाप पाडते आहे. तिचे ‘छावा’ आणि ‘अॅनिमल’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. आता ती लवकरच आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘थामा’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत झळकणार आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. हा चित्रपट २१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
दुसरीकडे, विजय देवरकोंडा नुकताच गौतम तिन्नानुरी दिग्दर्शित ‘किंगडम’ या तेलुगू अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात झळकला होता. त्याच्या भूमिकेचंही विशेष कौतुक झालं होतं.
प्रेम, करिअर आणि वैयक्तिक आयुष्य – तिन्ही आघाड्यांवर विजय आणि रश्मिका एकत्र यशस्वी ठरत असल्याचं चित्र आता अधिक स्पष्ट होत आहे.