मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ ऑक्टोबर २०२५
अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मानसी नाईक यांच्या आगामी चित्रपट ‘सकाळ तर होऊ द्या’ च्या निमित्ताने दोघं सध्या प्रसिद्धीच्या आखाड्यात उतरले आहेत. १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या दोन पात्रांच्या (टू-पर्सन) चित्रपटातून मानसी नाईक मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे, तर सुबोध भावे तिच्यासोबत पहिल्यांदाच एका संपूर्ण चित्रपटात स्क्रीन शेअर करत आहे. या चित्रपटातील अनुभवांबद्दल दोघांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत दिलखुलास गप्पा मारल्या, त्यात सुबोधने मानसीला दिलेल्या थेट सल्ल्याचाही उल्लेख केला.
मुलाखतीदरम्यान, मानसी नाईकने सुबोधच्या मदतीविषयी बोलताना त्याला एक ‘वडाचं झाड’ म्हणून संबोधलं. ती म्हणाली, “हा चित्रपट फक्त दोन पात्रांवर आधारलेला आहे. माझ्या आजवरच्या सर्व चित्रपटांमध्ये मल्टिस्टारर कास्ट होती. पण इथे सुबोधने खरंच माझं बोट धरून मला अभिनयात मार्गदर्शन केलं. तो सेटवर कायम एका आधारस्तंभासारखा होता.”
या भावनिक कौतुकाला उत्तर देताना सुबोध भावेनेही मानसीशी असलेली आपली जुनी ओळख आणि मैत्री उलगडली. तो म्हणाला, “२००८ मध्ये आम्ही पहिल्यांदा एका कार्यक्रमात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून मी तिच्या डान्सचा प्रचंड चाहता आहे. हे माझी पत्नी मंजिरी आणि माझे मित्रही जाणतात.”
सुबोधने एक जुना किस्सा सांगताना सांगितले की, ‘बालगंधर्व’ चित्रपटाच्या वेळी त्याने स्त्री पात्रांच्या सादरीकरणासाठी अनेक कोरिओग्राफर-मित्रमैत्रिणींची मदत घेतली होती, त्यात मानसीही होती. त्या चित्रपटात तिचं एक गाणं ठरलं होतं, पण दुर्दैवाने ते गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं.
पुढे बोलताना सुबोधने सांगितलं की, त्यांना यापूर्वीही काही चित्रपटांची एकत्र काम करण्याची संधी मिळाली होती, पण ती सगळी ‘लावणी’ विषयक होती. त्यावर तो म्हणाला, “जर तिने त्या सिनेमांमध्ये काम केलं असतं, तर लोकांना वाटलं असतं — मानसी नाईक आहे म्हणजे डान्सच असणार. पण मला आनंद आहे की, तिच्या अभिनयाला केंद्रस्थानी ठेवणारा हा चित्रपट वर्कआऊट झाला.”
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सुबोधने अत्यंत मनमोकळेपणाने मानसीला पूर्वी दिलेला सल्लाही उघड केला. तो म्हणाला,
“कधी कधी मी तिला फोन करून म्हणायचो — ‘बाई, हे बंद कर! कामाकडे लक्ष दे!’ कारण ती माझी १६-१७ वर्षांची जुनी मैत्रीण आहे. तिच्यातली कला मला नेहमीच भावली आहे, आणि एक मित्र म्हणून मला वाटतं की, जेव्हा ती खरं तर स्वतःला सिद्ध करू पाहते, तेव्हा तिचं काम लोकांपर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी आहे. यात मुळीच शहाणपणाचा भाग नाही, तर अनुभवाचा वाटा आहे, जो मी तिच्याशी शेअर करतोय.”
या स्नेहपूर्ण आणि प्रामाणिक नात्याची छाप त्यांच्या आगामी चित्रपटातही प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. ‘सकाळ तर होऊ द्या’ या भावनिक प्रवासातून अभय आणि नियतीची कथा उलगडताना, सुबोध-मानसीची ही ऑनस्क्रीन केमिस्ट्री किती भावते हे पाहणं रंजक ठरेल.