वाशिम प्रतिनिधी :
दि. ४ ऑक्टोबर २०२५ :
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत आज वाशिम जिल्ह्यातील अनुकंपा नियुक्ती व लिपिक-टंकलेखक भरती प्रक्रियेतील उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले. यामध्ये वाशिम मधील एकूण ९६ उमेदवारांचा समावेश आहे,”अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री आणि वाशीमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण अनुकंपा धोरणांतर्गत ४९ उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त ४६ उमेदवारांचा समावेश आहे. त्यातील राज्य शासनाच्या विविध विभागात ६७, वाशिम जिल्हा परिषदेत २० व जिल्हा पोलिस अधिक्षक वाशिम इथं ९ अशा एकूण ९६ उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाले आहेत. तसेच राज्यभरात १० हजारहून अधिक उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत.
राज्य शासनाने विकसित महाराष्ट्र-२०४७ या ध्येयाकडे वाटचाल करताना अनेक ऐतिहासिक आणि ठोस सुधारणा केल्या आहेत. या सुधारणा केवळ प्रशासकीय दृष्ट्या नाही तर नागरिकांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत. शासन सुधारणा उपक्रमाचा एक भाग म्हणून अनुकंपा नियुक्ती व लिपिक-टंकलेखक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आज वाशीमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यस्तरीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थिती दर्शवली.
श्री. भरणे म्हणाले, महा-भरती केवळ भरतीपुरती मर्यादित नसून सुधारणा आणि परिवर्तनशील शासन पद्धतीच्या बांधिलकीवर आधारित आहे. हजारो कुटुंबांना या नियुक्त्यांमुळे दिलासा मिळणार आहे. वाशिम जिल्ह्यातील अनेक तरुणांना यातून रोजगाराची साधी मिळाली याचा आनंद आहे. या माध्यमातून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचे पुनर्वसन सुलभ होईल. त्याचबरोबर शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध होऊन कामकाजात गती येईल. जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण व्हाव्यात, उद्योग-धंदे वाढावेत, शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय व खासगी क्षेत्रात नोकरी मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
“आज नियुक्ती पत्र मिळालेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी राज्याच्या सेवेत आपले मौल्यवान योगदान द्या. आणि ज्यांना अजून संधी मिळायची आहे, त्यांना सांगू इच्छितो, शासन तुमच्यासोबत आहे, पुढील दिवसांत आणखी संधी निर्माण होतील.” असेही श्री. भरणे म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान, व्यासपीठावर विधानसभा सदस्य आ. श्याम खोडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालीदास तापी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.