मुंबई प्रतिनिधी :
दि. ०७ ऑक्टोबर २०२५
ऑनलाईन खाद्यसेवा अॅपवरून ऑर्डर केलेल्या आईस्क्रीममध्ये अस्वच्छता आणि घाण दिसून आल्याचा अनुभव अभिनेत्री माही वीज हिच्या दत्तक मुलीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रकारानंतर संबंधित खाद्य वितरण अॅपच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
खुशी वीज हिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की तिने ‘ब्लिंक इट’ या अॅपवरून कसाटा आईस्क्रीम ऑर्डर केले. परंतु, जेव्हा तिने ते उघडले तेव्हा बॉक्स आधीच उघडलेला असून त्यात चिखल आणि मेलेल्या मुंग्या असल्याचं तिच्या लक्षात आलं.
खुशी म्हणते, “हा अनुभव अतिशय घाणेरडा आणि त्रासदायक होता. अशा परिस्थितीत कुणीही ते खाण्याचा विचारही करणार नाही. अशा सेवा पुरवणं अतिशय गैर जबाबदारपणाचं आहे.”
खुशीने हा प्रकार सार्वजनिक करताच अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आपले स्वतःचे वाईट अनुभवही शेअर केले. काहींनी खराब झालेले पदार्थ मिळाल्याचं सांगितलं, तर काहींनी ऑनलाईन खरेदी टाळण्याचा सल्ला दिला.
एका युजरने लिहिलं, “मी मागवलेल्या वस्तूंमध्ये माती होती, तर दुसऱ्याने लिहिलं की त्याच्या मुलीने बुरशी लागलेला पदार्थ खाल्ला होता.” अशा घटनांमुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो, याकडेही अनेकांनी लक्ष वेधलं. तर एका युजरच्या म्हणण्यानुसार या कंपन्या आपली तक्रार सिरियसली घेत नाहीत, पैसे परत देतो असे म्हणतात.
सद्यस्थितीत संबंधित अॅपकडून या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे ऑनलाईन खाद्यवितरण क्षेत्रात स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.