महाबळेश्वर प्रतिनिधी :
दि. ०७ ऑक्टोबर २०२५
महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारी तीव्र वाहतूक कोंडी ही गेल्या अनेक वर्षांपासून मोठी समस्या ठरत होती. यावर कायमचा उपाय म्हणून वेण्णा लेक बायपास रस्ता व कमानी पुलाच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सर्व परवानगी व अडथळे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या पुढाकाराने दूर करण्यात आले आहेत. तसेच वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्या सहकार्यामुळे या कामासाठी वन विभागाने ७८ गुंठे जागा उपलब्ध करून दिली असून, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचीही अंतिम मंजुरी मिळाली आहे.
वाहतूक सुलभतेसाठी नव्या मार्गाची आखणी
हंगामी गर्दीच्या काळात मॅप्रो गार्डन व वेण्णा लेक येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, वेण्णा लेकपासून अप्सरा हॉटेल मार्गे एकेरी वाहतुकीसाठी बायपास रस्ता तयार केला जाणार आहे. या रस्त्याची एकूण लांबी १७५० मीटर असून, त्यात एक छोटा पूल आणि वेण्णा धरणाच्या सांडव्याखाली ३० मीटर लांबीचा कमानी पूल बांधण्यात येणार आहे.
अप्सरा हॉटेलपासून १३०० मीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी १० कोटी रुपये, तसेच ४५० मीटर रस्ता व कमानी पुलासाठी १५ कोटी रुपये
असा एकूण २५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरणार कमानी पूल
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे यांनी सांगितले की, वेण्णा लेकजवळील कमानी पूल हे एक नवे पर्यटक आकर्षण ठरणार आहे. पावसाळ्यात धरणाच्या सांडव्यातून वाहणारे पाणी आणि सभोवतालचे निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना वेधून घेईल.
ना. मकरंद पाटील यांचे सहकार्य महत्त्वाचे
या प्रकल्पासाठी वर्षानुवर्षे विविध शासकीय विभागांकडून परवानग्या मिळवताना अनेक अडथळे आले. मात्र ना. मकरंद पाटील यांनी या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत केली. यासाठी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
या वेळी माजी नगराध्यक्ष किसनसेठ शिंदे, विशाल तोष्णीवाल, श्रीमती विमलताई पार्टे, सुनील शेठ शिंदे, युसुफ शेख, अफझल सुतार, संदिप साळुंखे, प्रकाश पाटील, अर्बन बँकेचे अध्यक्ष समीर सुतार, दत्ता वाडकर, शरद बावळेकर, विशाल तोष्णिवाल, रोहित ढेबे, तौफीक पटवेकर, अशोक शिंदे, अनिकेत रिंगे, ज्योती वागदरे, भक्ती जाधव, सुरेखा देवकर, अशोक शिंदे, अनिकेत रिंगे आदि पदाधिकारी उपस्थित होते.