नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १० ऑक्टोबर २०२५
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला सामना १४० धावांनी जिंकत आघाडी घेतली असून, आता मालिकेवर कब्जा मिळवण्याच्या निर्धारात टीम इंडिया आहे.
नाणेफेक भारताने जिंकली आणि कर्णधार शुभमन गिलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गिलने नाणेफेकीदरम्यान सांगितले की, संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पहिल्या कसोटीत खेळलेलेच ११ खेळाडू आज पुन्हा मैदानात उतरतील. मोहम्मद सिराजलाही संधी कायम ठेवण्यात आली आहे.
पहिल्या कसोटीत भारतासाठी के. एल. राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला होता. या दमदार प्रदर्शनाची पुनरावृत्ती करून भारत मालिकेत क्लीन स्वीप साधण्याच्या प्रयत्नात आहे.
गिलच्या कर्णधारपदाखाली ही पहिलीच कसोटी मालिका असून, जर भारत आजचा सामना जिंकला तर गिलसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. या मालिकेनंतर भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.
भारतीय संघ: यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडिज संघ: रोस्टन चेस (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, टेग्नारिन चंद्रपॉल, अॅलिक अथानासे, शाई होप, टेविन इमलाच (यष्टीरक्षक), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॉरिकन, खॅरी पियरे, अँडरसन फिलिप, जेडेन सील्स.