पुणे प्रतिनिधी :
दि. १५ ऑक्टोबर २०२५
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी तयारीचा धडाका लावला आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर महायुतीत नव्या मतभेदांची ठिणगी पडली आहे.
पुण्यात भाजप–शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वाद अजून शमलाच नाही, तोच मावळ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष पुन्हा चिघळला आहे. राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उघडपणे जाहीर केले आहे की, “जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीत असूनही आम्ही भाजपला एकही जागा देणार नाही — आणि नाही म्हणजे नाहीच!”
वडगाव मावळ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत शेळके यांनी स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी सांगितले, “युती झाली तरी ठीक, पण नाही झाली तरी आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत. आमच्या पक्षाचं बळ म्हणजे आमचे कार्यकर्ते आणि जनतेचा विश्वास. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणी आमचे उमेदवार सक्षम आणि लढाऊ आहेत. त्यामुळे कोणत्याही जागेचा त्याग करण्याचा प्रश्नच नाही.”
शेळके यांच्या या ठाम भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी महायुतीच्या गोटात मात्र चर्चांचा भोवरा सुरू झाला आहे. शेळके आणि भाजप यांच्यातील मतभेद नवे नाहीत — मागील विधानसभा निवडणुकीतही भाजपने त्यांच्याविरुद्ध उमेदवार न देता अपक्ष बापू भेगडे यांना पाठिंबा दिला होता. तरीही शेळके यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला होता.
आता पुन्हा एकदा मावळात “शेळके विरुद्ध भाजप” अशी थेट लढत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रंगणार, हे स्पष्ट दिसत आहे. महायुतीतील ह्या नव्या अध्यायाचा वाद पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.