मुंबई प्रतिनिधी :
दि. १५ ऑक्टोबर २०२५
राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय चहा ब्रँड म्हणून नावाजलेले येवले अमृततुल्य सध्या कायदेशीर अडचणीत सापडले आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्मिती व वितरण करणाऱ्या शेमारू एंटरटेन्मेंट कंपनीने परवानगीशिवाय चित्रपटातील दृश्यांचा वापर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी येवले अमृततुल्य कंपनी आणि तिच्या संचालकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
शेमारू एंटरटेन्मेंटकडे गोलमाल, फिर हेराफेरी यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचे स्वामित्व हक्क आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, येवले कंपनीने या चित्रपटांतील काही क्लिप्स आणि दृश्ये वापरून ‘मिम’ तयार केली आणि ती सोशल मीडियावर जाहिरातीसाठी प्रसारित केली. हे सर्व परवानगी न घेता करण्यात आल्याचा शेमारूचा आरोप आहे.
शेमारूने जानेवारी महिन्यातच येवले कंपनीला नोटीस देत हे मिम तातडीने हटवण्याचा इशारा दिला होता. मात्र, कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याने सुमारे ५० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा शेमारूने केला आहे.
याशिवाय, संबंधित चित्रपटांच्या क्लिप्स, पोस्टर्स आणि रिल्स वापरून सुमारे ५० लाख रुपयांची कमाई झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कंपनीचे संचालक — नवनाथ येवले, मंगेश येवले, गणेश येवले, नीलेश येवले आणि तेजस येवले — यांच्या विरोधात प्रतिलिपी अधिकार अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.