मुंबई प्रतिनिधी :
दि. १५ ऑक्टोबर २०२५
अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातील एका बालस्पर्धकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. ज्युनियर केबीसीच्या या भागात, गुजरातच्या गांधीनगरमधील १० वर्षांचा इशित भट्ट नावाचा मुलगा अमिताभ बच्चन यांच्याशी काहीसा उद्धटपणे बोलताना दिसतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी इशित आणि त्याच्या पालकांवर टीकेची झोड उठवली आहे.
या प्रकरणावर प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टची सुरुवात “इंटरनेट कधीही विसरत नाही” या वाक्याने केली आणि म्हटलं की, “ही एक करडी सत्यता आहे जी इशित आणि त्याच्या पालकांना पुढील काळात जाणवेल.”
इनामदार यांनी सांगितलं की, व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना राग आणि अस्वस्थता दोन्ही भावना निर्माण झाल्या. “अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वयाचा तरी सन्मान ठेवायला हवा होता,” असं त्यांनी नमूद केलं.
तथापि, त्यांनी हा व्हिडिओ आपल्या पत्नी सुचित्रा इनामदार (मानसोपचारतज्ज्ञ) यांना दाखवला असता, त्यांनी वेगळीच बाजू मांडली. “या मुलामध्ये ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) ची लक्षणं दिसत आहेत,” असं सुचित्रा यांनी निरीक्षण केलं.
यानंतर इनामदार यांनी पुन्हा व्हिडिओ पाहून अधिक संवेदनशील दृष्टीकोनातून विचार केला. त्यांनी लिहिलं, “इशितचा आत्मविश्वासाचा आव हा प्रत्यक्षात एक बचावात्मक भिंत आहे. आतून तो मुलगा घाबरलेला आहे. त्याचं हे वागणं ही मदतीसाठीची एक अप्रत्यक्ष हाक आहे.”
ते पुढे म्हणाले, “आजच्या काळात पालकत्व म्हणजे एक स्पर्धा झाली आहे. लहान मुलं स्क्रीनवर वाढत आहेत, संवाद आणि खेळ यांचा अभाव आहे. पालक आपल्या मुलांना प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी झटत आहेत, पण त्यांचं बालपण हरवत चाललं आहे.”
इनामदार यांनी सांगितलं की, ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’च्या ऑडिशनदरम्यानही त्यांना असे पालक भेटायचे जे आपल्या मुलांपेक्षा जास्त उतावीळ असायचे. “त्यांना मुलानं काही गाठावं यापेक्षा त्याला प्रसिद्धी मिळावी, एवढंच महत्त्वाचं वाटायचं,” असं ते म्हणाले.
भविष्यात ADHD, ऑटिझम, डिप्रेशनसारख्या मानसिक विकारांचे प्रमाण वाढणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. “इशितला थेरपीची गरज आहे, आणि त्याच्या पालकांना संयमाची,” असा थेट सल्ला त्यांनी दिला.
शेवटी नेटिझन्सना उद्देशून इनामदार म्हणाले, “या मुलाला किंवा त्याच्या पालकांना शिव्या घालण्यापूर्वी थोडं थांबा. इंटरनेटवर राग काढण्याचे अनेक मार्ग आहेत, पण संवेदनशीलतेने विचार करण्याची आज सर्वाधिक गरज आहे.”
त्यांनी शेवटी लिहिलं —
“प्रसिद्धीचा प्रकाश पचवायचा असेल तर आधी अंधाराची सवय करावी लागते. अन्यथा त्या झोताचे अवशेष डोळ्यांना आणि मनाला सतत बोचत राहातात. ‘सर्वांना चांगली बुद्धी दे’ — हीच आजची खरी प्रार्थना आहे असे मला वाटते.”